ज्ञानेश्वर माऊली , ( संतांची ओळख)


 

  ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा त्यानिमित्त हा माऊली वरील एक चींतन पर लेख

श्रावण वद्य अष्टमी शके ११९३ ही ज्ञानेश्वर माऊलींची जन्म तिथि कृष्ण जन्म अष्टमी ही माऊलींची जन्म तिथि*या मध्ये ७८ वर्ष मिळवली तर आपल्याला इसवीसन मिळेल म्हणजे दिनांक ६ ऑगस्ट १२७१ ही माऊलींची जन्म तारीख आणि कार्तिक वद्य 13 शके १२१५  ही माऊलींची समाधी घेण्याची तिथी*या मध्ये ७८ वर्ष मिळवली असता इसवीसन प्रमाणे तारीख मिळेल 

दिनांक ५ नोव्हेंबर १२९३ ही माऊलींची समाधी घेण्याची तारीख

उद्या कार्तिक वद्य  त्रयोदशी आहे माऊलींचा संजीवन समाधी दिवस

२१ वर्षाच्या अल्प आयुष्यामध्ये अवघ्या जगाला माउलींनी जे ज्ञान दिलं ते १०० वर्ष किंवा त्याहून ही जास्त जगलेल्या अनेकांना जमल नाही माऊली आणि त्यांची सर्वच भावंडं अर्थात त्यांचे अध्यात्मिक  गुरू व वडील बंधू *निवृत्ती नाथ जन्म शके ११९० व समाधी शके १२१६ क्षेत्र त्र्यंबकेश्वर तिथी ज्येष्ठ वद्य एकादशी सोपानदेव जन्म शके ११९६ समाधी शके १२१५ मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी सासवड. माऊली नंतर अवघ्या 1 महिन्यांनी त्यांनी समाधी घेतली* मुक्ताबाई जन्म शके ११९८ समाधी शके १२१६ तिथी वैशाख वद्य द्वादशी एकंदरीत या सर्व सत्पुरुष व संतांनी अवघ्या २७ वर्षात समाधी घेतली व सर्वांच्या तिथी पाहता एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी या आहेत. आपण जर आजवर कधीच ज्ञानेश्वरी या ग्रंथाला हात देखील लावला नसेल आणि आजवर एकदा ही एकही ओवी वाचली नसेल तर या पुण्य परायण विभूती साठी आज हा ग्रंथ विकत घ्या व आयुष्यात एक वेळ तरी अवश्य पारायण करा. आपल्याला नक्कीच लक्षात येईल की वय वर्ष 16 ला एखाद्या थोर व्यक्तीची प्रतिभा काय असू शकते. आपण फार मोठे ज्ञानी आहोत आपल्याला सर्व काही ज्ञात आहे हा अहंकार एका क्षणात विरून जाईल,आपल्या लक्षात येईल की आपल्याला फक्त वाचता येते अर्थ बोध होत नाही आणि क्षणात विचार चमकून जाईल की माऊलींनी एवढं अगाध ज्ञान एवढ्या लहानशा वयात कधी प्राप्त केले असेल,उगाचच लोक माऊली पुढे नतमस्तक होत नाहीत. 

कर्म,भक्ती आणि ज्ञान अशा तिन्हींचा ( त्रिवेणी ) संगम म्हणजे भगवद्गीता. एकूण १८ अध्याया मध्ये मिळून ७०० श्लोक भगवद्गीते मध्ये आहेत आणि या सातशे श्लोकांचा अर्थ जनसामान्यांना कळावा यासाठी माऊलींनी ९००० ओव्या लिहिल्या आणि सर्वांप्रत भगवद्गीता प्राकृतात पोहोचवली

सर्वप्रथम कर्म समजावून सांगण्यासाठी माऊलींनी प्रयोजलेल्या काही ओव्या आपण पाहूयात


हे कर्म मी कर्ता 

का आचरेण या अर्था

ऐसा अभिमानु

झणे चित्ता 

रीगो देसी

सर्व प्रथम आपण आपल्या मनात कोणत्याही कर्माचा मी कर्ता आहे याचा अभिमान येवू देता कामा नये

जे जे उचित

आणि अवसरे करून प्राप्त

ते कर्म हेतू रहित

आचरे तू

जे कर्म योग्य आहे आणि प्रसंगानुरूप करण्याचं आपल्या भाळी आले असेल ते कर्म आपण त्यातून आपल्याला लाभ होईल की हानी हा विचार मनी न आणता कोणता ही हेतू मनात न ठेवता केले पाहिजे

येथ वडील जे जे करिती

तया नाम धर्म ठेवीती

तेची येर अनुष्टिति

सामान्य सकळ

या जगात थोर व्यक्तींनी जे कर्म केले आहे त्यास धर्म असे नाव आंहे आणि सामान्य जन त्याचेच अनुकरण करतात त्यामुळे (अर्जुना तुझ्या हातून नेहमी योग्य तेच कर्म होणे अपेक्षित आहे त्यामूळे जन देखील तसेच वागतील तुला कर्म सोडून चालणार नाही)

परिस पा सव्यसाची

मूर्ती लाहोनी  देहाची

खंति करीती कर्माची

ते गावंढे गा

हे अर्जुना ज्यांना देह प्राप्त झाला आहे

मनुष्य शरीर प्राप्त झाले आहे त्यांनी कर्म करण्याची खंत कधीच करू नये कर्म करण्याचा कंटाळा करू नये ते अडाणी आहेत ,आपले नेमून दिलेले कर्म प्रत्येकाने केलेच पाहिजे.

आपल्याला नेमून दिलेले कर्म तोच आपला स्वधर्म

या स्वधर्मावरती माऊलींच्या फार सुंदर ओव्या आहेत

स्वधर्म जो बापा

तोची नित्य यज्ञ जाण पा

म्हणून वर्तता तेथ पापा

संचारू नाही

आपल्याला नेमून दिलेलं नित्य कर्म जर आपण व्यवस्थित करत असु तर तोच आपल्यासाठी यज्ञ आहे त्याचे आचरण करीत असता त्यात पापाचा शिरकाव होत नाही

जैसे गतायुषी शरीरी

चैतन्य वासू न करी

का निदैवाचा घरी

न राहे लक्ष्मी

ज्याप्रमाणे मृत शरीरामध्ये चैतन्य वास करत नाही किंवा कार्य न करणाऱ्या दुर्दैवी व्यक्तींच्या घरी लक्ष्मी वास करत नाही राहत नाही

तैसा स्वधर्म जरी लोपला

तरी सर्व सुखांचा थारा मोडला

जैसा दीपा सवे हरपला

प्रकाशू जाय पा

अगदी तसेच जो आपला नित्य कर्म आपल्याला नेमून दिलेले कर्म अर्थात आपला स्वधर्म पाळत नाही त्याला सुख कधीच लाभणार नाही ज्याप्रमाणे दिवा विझल्यानंतर प्रकाश हरवतो व अंधार होतो अगदी तसेच आपल्याला नेमून दिलेले कर्म आपण करणे सोडले की सुख देखील आपल्याला सोडून जाते

कर्म करीत असताना व्यक्तीने त्याच्या कर्म बंधनात स्वतःला अडकून घेऊ नये त्याचा अभिमान बाळगू नये त्याबद्दल आसक्ती हेतू   बाळगू  नये यासाठी उदाहरणादाखल त्यांनी कमळाच्या पानाचे उदाहरण घेतले आहे *कमळाचे पान पाण्यामध्ये असते परंतु त्याला पाणी  चीकटू शकत नाही तसे व्यक्तीने त्याचे कर्म करताना त्या कर्माच्या बंधनामध्ये उपाधी मध्ये अडकता कामा नये मी अमुक एक अधिकारी मी मोठा असा अभिमान बाळगता कामा नये

तो कर्मे करी सगळे परि कर्म बंधा नाकळेन सिंपे जळी जळे जैसे पद्दमपत्र

ज्ञानाबद्दल बोलताना माऊलींनी ज्या ओवी लिहिल्या आहेत त्या पाहूया

जरी कल्मशाचा आगरू

तू भ्रांतीचा सागरू

व्यामोहाचा डोंगरु

होऊन असशी

जरी तू पापाचे आगर असशील जरीही तू भ्रांती चा सागर असशील किंवा व्यामोह म्हणजे मनातील घोळ यांचा डोंगर असशिल

तरीही ज्ञान शक्तीचेनि पाडे

 हे आघवेची गा थोकडे 

ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी इये

तरी ज्ञान शक्तीच्या पुढे हे सर्व किरकोळ आहे

या ज्ञानाचा अंगी निर्दोष असे सामर्थ्य आहे

ऐसे जे नीज ज्ञानी

खेळत सुखे त्रिभुवनी

जगदृपा मनी

साठवून माते 

अशा माझ्या ज्ञानाने युक्त असलेले जे आत्मज्ञानी आहेत ते मी जो जगदृप आहे

त्याला अंतकरणामध्ये साठवून त्रैलोक्यामध्ये सुखाने क्रीडा व्यवहार करीत असतात

ऐसे जया  प्राणीयाच्या ठाई

या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हणून काई

वरी मरण चांग

अहो ज्या प्राण्याला ज्ञान संपादन करण्याची आवड नाही त्याला काय जीवन म्हणायचं त्या पेक्षा मृत्यू चांगला

ज्ञानानंतर माऊलीच्या भक्तीपर ज्या ओव्या आहेत त्याचा आपण थोडा मागोवा घेऊयात

परमेश्वर प्राप्तीचा सर्वात उत्कृष्ट मार्ग म्हणजे भक्तिमार्ग

जे जे भेटे भूत

तेथे मानीजे भगवंत

हा भक्ती योग निश्चित

जाण माझा

जो जो भूत म्हणजे या भु तलावर अर्थात पृथ्वी वर प्राणी दिसेल तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे ,भगवंत आहे त्या मध्ये आणि माझ्या मध्ये एकच भगवंत वसत आहे असे तू समजलास की हा माझा भक्तियोग आहे असे निश्चित समज

परी तया पाशी पांडवा

मी हरपला गिंवसावा

जेथ  नाम घोषू बरवा 

करीती माझा

जर मी हरवलो (म्हणजे मी दिसत नाही असे वाटत असेल किंवा कुणाला माझ्या भेटीची तळमळ आहे परंतु मी सापडत नसेल तर जिथे माझा नामघोष आनंदाने चालू आहे जिथे माझे नित्य नामस्मरण चालू आहे तिथे मी निश्चित आहेच, मी तिथे सापडेलच हे नक्की समजावे

पै भक्ती मी जाणे 

तेथ साने थोर न म्हणे 

आम्ही भावाचे पाहुणे 

भलतेया

भक्तीयोग यातील ही अत्यंत महत्त्वाची ओवी

माझ्यासाठी भक्ती किंवा सद्भाव हेच अत्यंत महत्त्वाचे कारण आहे मी फक्त भक्तीच ओळखतो मग त्या ठिकाणी हा लहान आहे यानी माझ्यासाठी फक्त फुल आणले आहेत आणि हा तर फार मोठा ज्याने मला सुवर्ण हार वाहिला असा दुजाभाव मी करीत नाही मला व्यक्ती मधील फक्त भक्ती भाव प्रिय आहे तुमचे भौतिक ऐश्वर्य व समृद्धी साधन नव्हे तर तुमची भक्ती व तुमचा सद्भावच हेच मला भावते लहान थोर  अशी निवड मी करीत नाही आम्ही वाटेल त्याच्या भक्ती रुपी मेजवानीचे पाहुणे असतो

येर पत्र पुष्प फळ

ते भजावया मिस केवळ

वाचुनी आमुचा लाग निष्फळ

भक्ती तत्व

एरव्ही तुम्ही पान वाहता की फुल किंवा फळ किंवा काय अर्पण करता हे  मला भजण्याचे फक्त निमित्त आहे

वास्तविक पाहता आम्हाला आवडते असे म्हटले तर ते फक्त भक्ताच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्तीतत्त्वच होय

तू मन बुद्धी साचेसी जरी माझिया स्वरूपी अर्पिसी

तरी मातेची गा पावसी

हे माझी भाक

तू मन आणि बुद्धी दोन्ही जर माझ्या स्वरूपामध्ये अर्पण केलीस तर मग माझ्याशी नक्कीच एकरूप होशील हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो आता हे मन व बुद्धी त्या भगवंताचे ठायी कशी एकत्र करता येईल या साठी माउलींनी चंद्र बिंबाचे *उदाहरण दिले आहे पौर्णिमा या तिथी पासून हळू हळू चंद्र लहान लहान होत होत अमावस्येला पूर्णतः नष्ट होतो अगदी तसेच

भोगा आंतूनी निगता

चित्त मज माझी रिगता

हळू हळू पंडुसुता

मीची होशील

तुझे मन भोग अर्थात भौतिक सुखाची साधने मनोरंजन अत्यंत आवड असणारे रुचकर पदार्थ ठराविक शरीर सुखाची लालसा या मधून बाहेर निघून ज्या वेळी माझ्याकडे लागेल त्या वेळेस सर्व भोग सुटून तू आणि मी एकच होवून जावूत

भगवद्गीता या ग्रंथातील एक एक ओवी वर भाष्य करताना त्याचा मतितार्थ आपल्या लक्षात यावा या साठी माउलींनी अनेक दृष्टांत देवून तो विषय आपल्यासाठी अत्यंत सोपा केला आहे तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ योग यातील श्लोक क्रमांक 7 अमानित्व, दंभरहिता,अंहिंसा, सर्वसहनशिलता, सरलपणा, सद्गुरूसेवा,अंतर्बाह्य शुध्दी,स्थैर्य व अंतः करण निग्रह हा विषय समजावून सांगण्यासाठी या एका श्लोका साठी तब्बल 327 ओव्या लिहून आपणास समजावून सांगितले आहे, हे एक उदाहरण जरी डोळ्यासमोर घेतले तरी आपल्याला त्यांच्या बुध्दीमत्तेचा आणि काव्य प्रतिभेचा अंदाज येईल

आठराव्या अध्यायात माऊली म्हणतात

सुवर्णमणी सोनया

ये कल्लोळू जैसा पाणिया

तैसा मज धनंजया

शरण ये तू

सोन्याचा मणी वितळवला असताना जसे त्याचे रूपांतर सोन्यात होते किंवा सागरा मधील कितीही उंच प्रचंड मोठी लाट शेवटी पाण्यामध्ये विसावून  ही लाट आणि हे पाणी असे वेगळे दाखवता येत नाही इथपर्यंत एकजीव होवून जातात त्याप्रमाणे अभिन्नत्वपणाने म्हणजे आता तू आणि मी हे दोन नाहीत आता आम्ही दोघे नव्हे तर एकच या अगदी एकजीव होण्याच्या भावनेने तू मला शरण ये सरते शेवटी माऊलींच्या पसायदान मधील एका ओवी बद्दल थोडंसं जाणून घेऊया आपल्याकडे सरसकट ही ओवी अगदी सहजपणे कुठेही वापरताना आढळते

जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात

अर्थ असा आहे की प्राणिमात्रांमधील कोणीही कशाचीही इच्छा केली तर त्याला ते प्राप्त होवो

परंतु सरसकट ही ओवी वापरण्या अगोदरच्या दोन ओव्या निश्चितपणे आपण लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये माऊली म्हणतात

जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो

भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे

दुरितांचे तीमिर जावो

विश्व स्वधर्म सूर्य पाहो

आणि या नंतर

जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात

ही ओवी येते

यामध्ये पहिल्या दोन ओळींचा अर्थ असा की खल प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींच्या मनातील वाकडेपणा इतरांबद्दलची दुष्टभावना दुसऱ्यांचा चांगलं होऊ नये ही वाईट भावना नष्ट व्हावी

परमपूज्य श्री धुंडा महाराज देगलूरकर यांचे पसायदान या फक्त नऊ ओव्या वरील 160 पानाचे पुस्तक अवश्य वाचावे यामध्ये आता विश्वात्मके देवे या ओवी मधील फक्त आता म्हणजे केव्हा आणि आता याचा अर्थ माऊलींना काय अभिप्रेत आहे यावरती आठ पाने आहेत यावरून आपल्याला आदरणीय श्री धुंडा महाराज देगलूरकर यांची प्रतिभा लक्षात येते

या पुस्तकामध्ये त्यांनी खल पुरुषाची व्याख्या करताना अतिशय सुंदर उदाहरण दिलेले आहे त्यामध्ये ते म्हणतात एक व्यक्ती जंगलामध्ये राहत होती त्या जंगलातून सहजच एक सतपुरुष दुसरीकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांना ती व्यक्ती दृष्टीस पडली आणि त्यांनी त्याला सांगितले बाबा तू या जंगलामध्ये राहू नकोस इथे अत्यंत हिंस्त्र श्वापदे राहतात जी केव्हाही तुझ्या जीवावर उठतील व तुला मारून खाऊन टाकतील त्यावर त्या व्यक्तीने उत्तर दिले की मी त्यासाठी इथे जंगलामध्ये राहत आहे की जेणेकरून त्या हिंस्त्र श्र्वापदानी मला खावे ज्यामुळे त्यांना माणसाच्या रक्ताची गोडी निर्माण होईल चटक लागेल व त्यामुळे ते आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन तेथील माणसांना खाऊ लागतील ही झाली खळाची व्याख्या

 ज्यांची अशी  वृत्ती नष्ट झालेली आहे अशा व्यक्ती आणि अशी भावना नष्ट होऊन ज्यांना सत्कर्मा मध्ये आवड निर्माण झालेली आहे सत्कर्माबद्दल गोडी निर्माण झालेली आहे, जिथे पापाचा अंधकार नाही आणि जिथे स्वधर्माप्रमाणे वागता येते सहज शक्य आहे  अशा प्राणीमात्रांनी व्यक्त केलेल्या इच्छा पूर्ण होवोत

असे माऊलींना अभिप्रेत असावे

अन्यथा जो जे वांछील तो ते लाहों हे एवढे सहज आणि सरसकटपणे वापरणे एवढे सोपे नाही मित्रानो या अगदी उदाहरणादाखल घेतलेल्या माऊलींच्या  ज्ञानेश्वरी या ग्रंथामधील ओव्या आहेत एवढा आघाध ज्ञानाचा महासागर *आपल्यासमोर उलगडून ठेवत असताना देखील माऊलींची विनम्रता यत्किंचितही कमी होत नाही हे या दिव्य अशा व्यक्तीचे थोर पण आहे कुणाला माऊली बद्दल काही समजावून सांगावे ही काही माझी पात्रता नाही आपण विनम्रपणें माझ्या भावना फक्त समजून घ्याल अशी अपेक्षा करतो सरते शेवटी माऊलींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत माऊलींच्या चरणी मी शतशः शरण आहे. ज्यांनी जगाला अभूतपूर्व ज्ञान दिले अशा या थोर विभूती ला त्यांच्या ग्रंथामधिल कमीतकमी काही ओव्या दररोज वाचून स्मरणात ठेवण्याचा संकल्प करूया माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय*माऊली माऊली माऊली

राम कृष्ण हरी..

लेखक : रविंद्र प्र देशपांडे, पुणे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने